सोलापुरात तापमानाचा पारा वाढतोय   

पालकांनी घ्यावी मुलांची काळजी ! 

सोलापूर( प्रतिनिधी ) :-  उन्हाळी लागणे म्हणजे लघवी करताना जळजळ होणे, लघवीचे प्रमाण कमी होणे, लघवीचा पिवळसर पांढरा रंग बदलून गडद पिवळा होणे, अशी लक्षणे दिसतात. उन्हाळ्यात अशी समस्या अधिक प्रमाणात अनेकांना भेडसावत असल्याचे दिसून येते. त्यावेळी घाबरून न जाता घरगुती उपाय केल्यास निश्चितपणे तो त्रास कमी होऊ शकतो, असे डॉक्टर सांगतात.
  
सध्या उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढू लागला असून एप्रिलच्या सुरवातीलाच तापमानाचा पारा ४१ अंशावर पोचला आहे. रस्त्यावरून ये-जा करताना देखील उन्हाचा तडाखा जाणवतो. त्या त्रासामुळे अनेकांना उन्हाळी लागते आणि अस्वस्थ वाटू लागते. उष्ण प्रकृतीच्या व्यक्तींना उष्ण काळात उन्हाळीचा त्रास अधिक प्रमाणात होण्याची शक्यता अधिक असते. अशा व्यक्तींनी त्रास होऊ नये म्हणून जास्त उन्हात कार्यालय किंवा घराबाहेर न पडणे हा त्यांच्यासाठी उपाय आहे. उन्हात बाहेर पडताना पायात चप्पल असावी, साधी सुती कपडे परिधान करावीत. आवश्यक कामासाठी बाहेर पडताना सोबत पाण्याची बाटली घेऊन जावे आणि जास्त काळ उन्हात एकाच ठिकाणी थांबू नये, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
 
उन्हाळी लागू नये म्हणून अशी घ्या खबरदारी
 
■ उन्हाळ्यात घामातून शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, त्यामुळे भरपूर पाणी प्यावे
 
■ रात्री झोपताना मातीच्या मटक्यात तुळशीचे बी, धने, खडीसाखर व पाणी एकत्र करून ठेवावे आणि सकाळी कुस्करून प्यावे
 
■ कलिंगड, टरबूज या सारख्या रसदार फळांचा खाण्यात उपयोग करावा
 
■ लघवीचा वेग अडवून ठेऊ नये, उष्ण वातावरणात उष्ण पदार्थ खाणे टाळावेत
 
■ स्वच्छ शौचालयाचा वापर करावा, उन्हातून आल्यावर ताबडतोब अतिथंड गोष्टींचा वापर करू नये
 
असे करता येतील उपाय
 
■ पाणी पिण्याचे प्रमाण वाढवावे, नुसते पाणी न पिता त्यात धने व खडीसाखर टाकून प्यावे
 
■ उन्हात घराबाहेर जाणे टाळावे, आवश्यक असेल तर डोक्यावर टोपी, स्कार्फ, अंगात सनकोट डोळ्यावर गॉगल असावा
 
■ गुलकंद किंवा मोरावळा खावा, वारंवार त्रास होत असल्यास गोखरू काढा घ्यावा
 
■ पाय थंड पाण्यात बुडवून ठेवावेत, लघवीला होत नसल्यास ओटीपोटावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात 
 

Related Articles